येत्या लोकसभा निवडणुकीत शिवसेना भाजप ची युती झाली नाही तर लोकसभेचे तिकीट आपल्या पदरात पडू शकते याची पूर्व कल्पना असल्याने भाजप चे शहर अध्यक्ष किशनचंद तनवाणी तयारीला लागले आहे. शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस पक्षांमधील नाराज त्यांच्या भेटीगाठी घेत आहेत. तनवाणी यांच्या, शहरातील १० पेक्षा अधिक नगरसेवक, व पदाधिकारी संपर्कात असल्याची माहिती भाजपच्या एका वरिष्ठ पदाधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर दिली.
मागील ३० वर्षे शिवसेनेत सक्रिय राजकारणात असलेले व खासदार खैरे यांच्या प्रत्येक राजकीय डावाची तोड असणारे अशी ओळख असलेले पुर्वश्रमीचे शिवसैनिक व सध्या भाजप चे शहर अध्यक्ष किशनचंद तनवाणी हे शिवसेना भाजप ची युती झाली नाही तर लोकसभा निवडणूक लढविण्यासाठी भाजप कडून इच्छुक आहे. युती झाली नाही तर आपण पक्षश्रेष्ठी समोर ताकदीमध्ये कुठेही कमी पडू नये या साठी तनवाणी यांनी मोर्चे बांधणी करण्यास सुरुवात केली आहे. कारण इच्छुकांमध्ये विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, डॉ. भागवत कराड यांच्या सारखे दिग्गज आहेत. औरंगाबाद शहरातील शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस चे सुमारे १० नगरसेवक आजी माजी पदाधिकारी संपर्कात आहेत. या पैकी बहुतांश खैरे यांच्या कार्यशैलीवर नाराज असणारे नगरसेवक , व पदाधिकारी आहेत. खैरे यांचा तगडा जनसंपर्क आहे. त्या मानाने इतर पदाधिकारी मात्र मतदार संघापुरते मर्यादित असून मतदार संघाबाहेर तुरळक जनाधार आहे .तनवाणी यांनी नगरसेवक, महापौर ते विधानपरिषद आमदार असा प्रवास केला आहे आणि या दरम्यान ते नेहमी लोकांशी जुळून राहिल्याचा फायदा शिवसेना भाजप युती झाली नाही आणि पक्षाने लोकसभेचे तिकीट पदरात टाकले तर त्यांना होऊ शकतो.
पक्षाने आदेश दिल्यास लोकसभा लढवेन
भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेची युती झाली नाही तर मी लोकसभा लढविण्यास इच्छुक आहे .अन्यथा पक्ष जी जबाबदारी देईल ती मला मान्य आहे.
-किशनचंद तनवाणी, भाजप शहराध्यक्ष